Class 11 Marathi Yuvakbharati -Chapter 2 - Pransai

वर्ग ११ वा विषय : मराठी , कविता : प्राणसई 


कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. लहानवयापासून वाङ्मयाचे संस्कार. उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न

काव्यशैली. 'सहवास' हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. 'शेला', 'मेंदी', 'मृगजळ', 'रंगबावरी', 'बाहुल्या', 'गर्भरेशीम' इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. 'श्यामली', 'चैतू हे कथासंग्रह व 'मृद्गंध', 'मालनगाथा' हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. त्यांच्या गर्भरेशीम' या कवितासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
उन्हाळा संपत आलेला असला तरी त्याचा ताप अजूनही असह्य आहे. पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. घराघरांत, शेताशेतावर आवश्यक पूर्वतयारी झाली आहे. अशा वेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करताना कवयित्रीने या कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला म्हणजे मेघमालेला केलेले आवाहन, धाडलेला निरोप भावरम्य आहे. ग्रामीण भागातील घराघरांतून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे वर्णन समर्पक शब्दांत कवितेत आले आहे. ही तयारी झाल्यावर पावसाची आळवणी केली आहे.
प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून दुसऱ्या व चौथ्या चरणाला यमक साधलेले आहे.


कवितेचा अर्थ

'पीठ कांडते ....................................गुंतून?'

जणू काही आभाळात राक्षसीण धान्य कांडत असावी इतके कडक ऊन पडले आहे. उन्हाळा संपत आलेला असला तरी उन्हाचा ताप असह्य होत आहे. उन्हाच्या तडाख्याने जीव हैराण/कासावीस झाला आहे. अशावेळी प्राणसई (माझी प्राणप्रिय सखी) मेघमाला, कोणत्या कामात गुंतून राहिली बरे? दिला पाखरांच्या मैत्रपणा आठवून..." तुझ्या प्रतिक्षेत असलेली मी तुझ्या भेटीसाठी इतकी आतुर झाले आहे, की माझा निरोप तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावा म्हणून मी तो पाखरासोबत धाडला आहे. हे सखी घनावळी, आपल्या दोघींची ती दृढ मैत्री आठवून आतातरी तू लवकर ये


पडवळ...........

तू आलीस म्हणजे तुझ्या मागोमाग तो वरुणराजा येईलच तो येणार म्हणून घराघरांत, शेताशेतावर पूर्वतयारी सुरू आहे. पावसात बहरणाऱ्या पडवळ, भोपळा अशा वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी तयार केलेल्या मातीच्या आळ्या मी भाजून ठेवल्या आहेत. सुकलेल्यागोवऱ्यांचा ढीग मोडून त्या गोवऱ्या घरात नीट रचून ठेवल्या आहेत.


'बैल झाले ................उन्हाच्या लागून,

उन्हाचा ताप मुक्या गुरावासरांना इतका असह्य होत आहे, की मालकाने गाई गुरांना आता गोठ्यात दावणीला बांधून ठेवले आहे. पावसाच्या चिंतेने त्यांचे मालक अस्वस्थ झाले आहेत. तापल्या उन्हाच्या गरम झळा न सोसवल्यामुळे लहानग्याजीवांची तोंड सुकून गेली आहेत.

'विहिरीच्या ... ......................तू सांग?
कडक उन्हामुळे विहिरी आटल्या आहेत. विहिरीच्या खोल तळाशी थोडेसेच पाणी शिल्लक आहे. सूर्यकिरणे
पडल्यामुळे ते पाण्याचे गोलाकार भिग जणू चकाकत आहे. माझे मन घरात रमत नाही, तू कधी येशील बरे?


'ये ग दौडत ............स्वप्नांवर 
मेघमाले, तू धावतपळत आधी माझ्या शेतावर बरस पाहू! तू बरसशील, तेव्हा तुझ्या येण्याने शेते हिरवीगार होऊन जातील, म्हणून शेतीभाती भरघोस पिकण्यासाठी व शेतमालकांचे हिरवे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तू ये.

 'तशी झुलत.......................

तशीच डुलतझुलत तू माझ्या घराजवळही ये. तुझ्यातून बरसणाऱ्या, चमचमणाऱ्या सरीमध्ये तुझे भाचे मनसोक्त खेळतील.

'आळे वेलाचे,...................चिंब चिंब;
मी भाजीपाल्यासाठी तयार केलेली आळी तुझ्या पाण्याने भिजू दे, विहीर काठोकाठ भरू दे. माझे सर्व घरदार पावसाने शिपून निघू दे.


उभी राहून...........कौतुक सांगेन...' 

तू अशी पाऊस घेऊन आलीस, की मी दारात उभी राहून तुझ्या सोबत खूप गप्पा मारेन माझा सखा काळ्या आईची सेवा करण्यासाठी, हिरवे स्वप्न फुलवण्यासाठी शेतात दंग होऊन काम करत असेल, त्याचे कौतुक तुला सांगेन.


'कांग वाकुडेपणा हा, ..............वा्यावरून भरारी.

मी इतकी विनवणी करत आहे, तुला निरोप धाडत आहे; पण तू मनात अढी धरून का बरे बसली आहेस? तू माझ्याकडे अशी पाठ का फिरवली आहेस?  ये ग, प्राणसई ये. वा्यावर स्वार होऊन तू लवकर मला
भेटायला

प्रणासई  ( स्वाध्याय )
(१) (अ) चौकटी पूर्ण करा.

(१) कवयित्रीने जिला विनंती केली ती
उत्तर: प्राणसई घनावळ
(२) कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा
उत्तर: पीठ कांडते राक्षसी
(३) कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी
उत्तर: पाखरे
(४) शेतात रमणारी व्यक्ती
उत्तर: सखा

(आ) कारणे लिहा :


१) बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत.
(२) बाळांची तोंडे कोमेजली; कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत.

(इ)  कृती करा.


कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा :
उत्तरे:
१) वेलाचे आळे भिजू दे.
२) विहीर तुडुंब भरू दे.
३)घरदार चिंब होऊ दे.
४) दारात उभी राहून सख्याचे कौतुक सांगू दे.

 (२) (अ)पुढील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा :

१) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर : उन्हाने शेते पोळली आहेत. त्यामुळे शेतकरी बेचैन आहेत. बैल ठाणबंद
झाले आहेत. म्हणून कवयित्री घनावळीला विनवते की, तू आधी धावतपळत लवकर माझ्या शेतावर ये.
(२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशी : उन्हाच्या झळांनी बाळांची तोंडे कोमेजली आहेत. त्या बाळांना आनंद वाटावा म्हणून कवयित्री प्राणसई घनावळीला सांगते की, तू झुलते झुलत, रिमझिम करत माझ्या घरापाशी ये.
(३) विहिरीच्या तळीं खोल दिसू लागले ग भिंग : कडक उन्हामुळे विहिरीचे पाणी आटले आहे. विहिरीचा खोल
गेलेला तळ दिसतो आहे. तिच्या तळाशी जे थोडे पाणी आहे, ते उन्हाच्या तिरिपीमुळे चकाकते आहे. जणू विहिरीच्या
तळाशी आरसा चकाकतो आहे.


आ) खलील तक्त्यात  सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा.


प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी
१) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
(२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशी
(३) ये ग ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी
प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी१) तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून
(२) मन लागेना घरात कधी येशील तू सांग
प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी१) ये ग ये ग घनावळी मैत्रपणा आठवून
(२) उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन
मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी(१) शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर
(२) सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन



(काव्यसौंदर्य)


 (अ) खलील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा :

(१) 'का गं वाकुडेपणा हा
का गं अशी पाठमोरी ?
ये गं ये गं प्राणसई
वाऱ्यावरून भरारी.’
उत्तर : 'प्राणसई' या कवितेमध्ये कवयित्रीने प्राणसई घनावळ मैत्रिणीच्या नात्याने बरसण्याची विनवणी केली आहे.कडक उन्हाळ्याचा दाह सगळे शेतकरी सहन करत आहत. पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत. उन्हाच्या झळा लागून बाळाचे चेहरे कोमेजले आहेत. घरातील मंडळींची मने उदास झाली आहेत. शत उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा अवर्षणाच्या वेळी कवयित्री पावसाळी ढगांची विनवणी करताना म्हणते की, हे प्राणप्रिय सखी, तू अशी विपरीत का वागत आहेस? आमच्याकडे तू पाठ का फिरवली आहेस? वाऱ्यावरून झेप घेत तू लगबगीने खाली ये आणि थेंबांची बरसात कर.
भावपूर्ण शब्दांत काळजाची व्यथा या ओळींमधून प्रकर्षाने व प्रत्ययकारी रितीने व्यक्त झाली आहे.

(२) 'शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर
उत्तर : 'प्राणसई' या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी मेघमालेला 'प्राणसई' असे संबोधले आहे. कडक उन्हामुळे शेते उजाड झाली आहेत, म्हणून कवयित्री मेघमालेला भावपूर्ण शब्दांत आर्जव करत आहेत.
कडक उन्हामुळे घरादारातील माणसे व्यथित आहेत. बाळांचे चेहरे हिरमुसले आहेत. कामाअभावी बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. शेतकरी निराश झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीत कवयित्री पावसाळी ढगांना विनवते आहे की, आधी धावतपळत, लगबगीने माझ्या शेतावर बरस. माझ्या धन्याच्या मनातली स्वप्ने कोमेजून गेली आहेत. धनधान्याने भरलेली हिरवी शेते त्याला पाहायची आहेत. म्हणून कवयित्री म्हणतात की, हे प्राणसई, तू दौडतधावत ये आणि मालकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर हिरवा शेला पांघर. हिरवीगार शेती बहरू दे.
- अतिशय भावविभोर शब्दांमध्ये कवयित्रींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. हिरव्या शेतांना हिरव्या शेल्याचे योजलेले प्रतीक अनोखे व चपखल आहे.


(आ) कवयित्रींनी उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना
योजलेली प्रतीके स्पष्ट करा.
उत्तर : कवयित्री इंदिरा संत यांनी 'प्राणसई' या कवितेमध्ये पाऊस येण्यापूर्वीची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मानसिक घालमेल भावपूर्ण शब्दांत व्यक्त केली आहे.
कडक उन्हाळ्यामुळे घरदार, शेते व परिसर यांची कशी वाताहत होते, याचे यथोचित वर्णन काही प्रतीकांमधून प्रत्ययकारी पद्धतीने केले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना कवयित्रींनी 'राक्षशीण पीठ कांडते' हे प्रतीक वापरले आहे. एखादी राक्षसी जशी जात्यावर पांढरेधोप पीठ काढते, त्याप्रमाणे कडाक्याचे ऊन भासते आहे. विहिरी आटल्या आहेत, हे सांगताना त्यांनी 'भिंगाचे' प्रतीक वापरले आहे. विहिरीमध्ये खोल तळाशी थोडेसे पाणी उरले आहे. त्यावर उन्हाची तिरीप पडल्यामुळे जण ते आरशासारखे चकाकते आहे. शेते उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले आहेत, हे सांगताना कवयित्रींनी 'बैल ठाणबंद' झाले, असे सार्थ प्रतीक वापरले आहे. एखादया योद्ध्याला जसे जेरबंद करून ठेवावे, तसे बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत.
अशा प्रकारे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे भीषण वास्तव सार्थ प्रतीकांतून कवयित्रींनी मांडले आहे.

(इ) 'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे
आहे,' हे स्पष्ट करा.
उत्तर : प्राणसई घनावळीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मैत्रिणीची भावावस्था कवयित्री इंदिरा संत यांनी 'प्राणसई' या कवितेत भावपूर्ण शब्दकळेत साकार केली आहे.
कवयित्री पावसाळी ढगांना, म्हणजे मेघमालेला 'प्राणसखी' असे संबोधतात. ही घनावळ कोठे गुंतून पडली आहे, ती माझ्या सादेला प्रतिसाद का देत नाही, म्हणून कवयित्री अस्वस्थ आहेत. मी पाखरांच्या हाती तुला निरोप धाडला आहे, आपली मैत्री आठवून तू धावत ये, अशी कळकळीची विनवणी कवयित्री प्राणसईला करत आहेत. एखादया सखीला मनातले गूंज सांगावे, तसे पावसाअभावी झालेल्या परिसराचे व घरादाराचे वर्णन कवयित्री घनावळीला करत आहेत. तू आलीस की दारात उभी राहून मी तुझ्याशी गुजगोष्टी करीन, माझ्या सख्याचे शेतामधल्या कष्टाचे कौतुक तुला सांगेन, असे हळवे आश्वासन त्या पाणसईला आहेत.
या सर्व वर्णनावरून कवयित्री व प्राणी यांच्यातील प्रेममय ऋणानुबंध व मैत्रीचे नाते स्पष्ट होते.

(अभिव्यक्ती)
 (अ) तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
नमुना उत्तर : आम्ही पर्जन्यछायेच्या प्रदेशात, म्हणजेच दुष्काळी भागात राहतो. आमची सारी उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. पाऊस पडला नाही की आमची दयनीय परिस्थिती होते.
पाऊस येण्यापूर्वी आमच्याकडे कडक उन्हाळा असतो. नदी, नाले, विहिरी आटून रोडावतात. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पिण्यासही पाणी मिळत नाही. गुराढोरांचे हाल होतात. त्यांना चारा मिळत नाही. झाडे सुकतात. सर्वत्र पाचोळा होतो. पक्षी दिसेनासे होतात. डोंगर बोडके होतात. सर्वत्र रखरखाट होतो. ऊन अंग जाळत जाते. डोळे नि मन थकून निराश होते. लहानग्या मुलांना अन्नाचा घास मिळत नाही. शेतजमीन तडकते. तिला भेगा पडतात. डोहामध्ये खड्डे खणून जेमतेम पाणी मिळते. घशाला कोरड पडते. आकाश आग ओकीत राहते. पावसाच्या प्रतीक्षेत जो तो आकाशाकडे डोळे लावून बसतो. काही शेतकरी स्थलांतर करतात. गाव भकास होते. जीवनेच्छा मालवून जाते.

(आ) पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
नमुना उत्तर : पावसानंतर माझ्या परिसरातील सृष्टीचे रूप बदलना जाते. कडक उन्हात रखरखीत झालेल्या जमिनीवर हिरवळीची शाल अंथरली आहे, असा भास होतो. बोडके डोंगर गवततुऱ्यांनी नटतात. त्यांतून धबधब्याची पाझर दुधाच्या पाण्यासारखे खाली झेप घेतात. नदी, नाले, ओढे खळखळ वाहत गाणे म्हणत हुंदडतात. पेरणी व लावणी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंदाचे कारंजे थुई थुई उडू लागते. झाडे अंघोळ केल्यासारखी स्वच्छ व तजेलदार होतात. गुरेढोरे आनंदाने बागडत पोटभर चारा खातात. पोरेटोरे उल्हासाने पाण्यामध्ये उड्या मारत । खेळ तात, घरेदारे ताजी टवटवीत होऊन आनंदाचा हुंकार देतात. पाखरे मुक्तपणे आकाशात भरारी घेतात व मजेत विहार करतात.
पावसानंतर सर्व चराचराचा कायापालट होतो. माणसांची, पशु पक्ष्यांची तहान शमते. माझ्या गावाचे आनंदवनभुवन होते.

(इ) पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.
उत्तर : मनासारखा पाऊस झाला की पहिला आनंद होतो, तो शेतकऱ्यांना! माती कसून, नांगरून, पेरणी करून त्यांनी अपार कष्ट केलेले असतात. त्या कष्टांचे फळ पावसानंतर मिळेल, या आशेने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते व मन आनंदाने मोहरून जाते. पावसानंतर ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्वच माणसांना आनंद होतो; कारण वर्षभराची पाण्याची चिंता मिटून जाते. पावसानंतर ग्रामीण भागात दुष्काळ पडण्याचे भीषण संकट टळते. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकणार्या गुराढोरांना, पशुपक्ष्यांना पावसानंतर मुबलक पाणी प्यायला मिळते. पशुपक्षी आनंदी होतात. पावसानंतर झाडांना नवीन लकाकी येते. डोंगरावर हिरवळ उगवते. तृषार्त जमिनीची तहान शरमाते. सृष्टी पावसानंतर पालवते, हिरवीगार होते. पावसानंतर चराचरात उत्साह संचारतो. धरतीचा तो पुनर्जन्म असतो.

(५) प्राणसई-रसग्रहण
उत्तर :    मराठीतील प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांनी पाऊस पडण्यापूर्वीची ग्रामीण मनाची सर्व अस्वस्थता 'प्राणसई' या कवितेमध्ये भावोत्कर शब्दांमध्ये साकारली आहे. आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांना त्यांनी प्राणप्रिय सखी मानून या प्राणसईशी त्यांनी हृदय-संवाद साधला आहे. _कडक उन्हाळ्यामुळे झालेली घरादाराची व परिसराची वाताहत. शेतकऱ्याचे पावसासाठी व्याकुळ होणे व आतुरलेल्या मनाची तडफड ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. कवयित्रींनी स्वत:ला मेघमालेची मैत्रीण मानले आहे व मैत्रीच्या नात्याने मेघमालेला मनापासून विनवणी केली आहे.
अष्टाक्षरी छंदात गुंफलेली कविता ही यमक प्रधान असून, अत्यंत । साध्या शब्दकळेत मनातील भाव साकार करण्याची किमया कवयित्रींनी सहजगत्या साधली आहे.
स्थूलमानाने कवितेचे दोन भाग पडतात. पहिल्या पाच कडव्यांत पावसाअभावी झालेल्या दुर्दशेचे चित्र प्रत्ययकारी शब्दात रंगवले आहे. नंतरच्या कडव्यांतून 'प्राणसई' धरतीवर आल्यावर तिचे स्वागत कसे केले जाईल, याचे वर्णन उत्फुल्ल व प्रसन्न शब्दशैलीत साकारले आहे. उन्हाचा तडाखा सांगताना कवयित्रींनी 'विहिरीच्या तळीचे भिंग' ही सार्थ प्रतिमा वापरली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती 'ठाणबंद बैल' या प्रतिमेत प्रत्ययकारी ठरली आहे. तसेच पावसाच्या आगमनाचे स्वागत। करताना 'स्वप्नांवर पांघरलेला हिरवा शेला' ही समर्पक प्रतिमा योजली आहे. त्यातून आर्ता आणि आनंद यांचा उत्तम मेळ साकारला आहे.
आर्तता, भावपूर्णता नि उत्कटता हे या कवितेचे स्थायीगुण आहेत. प्रसाद आणि माधुर्य हे काव्यगुण दिसून येतात. साध्या पण संपन्न शब्दकळेमुळे या कवितेतील भाव रसिकांच्या काळजाला थेट भिडतो. म्हणून अष्टाक्षरी छंदातील ही नादमय कविता मला खूप आवडली आहे.