Class 11 Marathi Yuvakbharati - Natak -2- Dhyanimani / ध्यानीमनी

विषय : मराठी नाटक -साहित्यप्रकार - परिचय : भाग -३ , 

2.ध्यानीमनी


 प्रशांत दळवी (१९६१) :

प्रसिदध नाटककार व चित्रपट-कथालेखक. चारचौघी, ध्यानीमनी, चाहूल, सेलिब्रेशन, गेट वेल सून ही नाटके आणि खिडक्या हा कथासंग्रह प्रकाशित. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व पुरस्कार', 'जयवंत दळवी पुरस्कार', 'दगड का माती' या प्रायोगिक नाटकाच्या नाट्यलेखनासाठी 'नाट्यदर्पण पुरस्कार' अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
ध्यानीमनी' हे अगदी वेगळ्या समस्येचे चित्रण करणारे व्यावसायिक रंगभूमीवरील एक दर्जेदार नाटक आहे. ठिकठिकाणी आढळणाऱ्या व सर्वांचे लक्ष असूनही एरवी दुर्लक्षित असलेल्या अपत्यहीनतेच्या समस्येचा घेतलेला कलात्मक आणि मानसशास्त्रीय वेध हे या नाटकाचे बलस्थान आहे. अपत्यहीन स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, त्यामधून त्या स्त्रीच्या मनात उठणारी भावनिक आंदोलने, त्यातून तिच्या संसारात उभे राहणारे मानसिक वादळ, त्यामध्ये तिचा पती सदाचे असणारे तटस्थ सहकार्य आणि मोहितबाबतची वस्तुस्थिती पटवून देण्याचा डॉ. समीरचा प्रयत्न हा या नाटकाचा विषय आहे. सदानंद-शालन आणि समीर-अपर्णा हे पती-पत्नी म्हणजे या नाटकातील प्रमुख पात्रे आहेत. 'मोहित' या काल्पनिक मुलाच्या रूपाने आपल्या जीवनात मातृत्वाचे रंग भरणारी शालू आणि काल्पनिक जग कोणते व वास्तव कोणते या विचाराने गोंधळलेला सदा या दोघांच्या मनातील घालमेल या नाटकात नाट्यरूपाने प्रकट होते. विषयाशी
एकरूप झालेल्या सहजसुलभ संवादशैलीमुळे नाटक तीव्रतेने प्रेक्षकांच्या; वाचकांच्या मनाला भिडते.
एका बाजूला मूल नसल्यामुळे नात्यात आलेला कोरडेपणा तर दुसऱ्या बाजूला कल्पनाविश्वातील मुलाबरोबर रमताना येणारा भावनिक ओलावा यांमुळे मनाची पकड घेत नाटकाचे कथानक गतिमान होते. सदाचा घुमेपणा व शालूने गाठलेले अति उत्साहीपणाचे टोक, ही जी मनोविकृती आहे याचे वास्तव चित्रण नाटकातून घडते.
निपुत्रिक स्त्रीकडे बघण्याचा दूषित दृष्टिकोन, 'मूल असल्याशिवाय आयुष्याची परिपूर्ती नाही', अशी खुळी सामाजिक समत येथे दिसून येते. अशा सामाजिक दडपणांतून, हतबलतेतून मनोविकृती निर्माण होतात का? असा प्रश्न पडतो. नाटकातून सूचित होणारा हा विचार त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बाजूंसह परिपक्वतेने निकोयतेकडे वळावा, हा या नाटकाचा उद्देश आहे. आपल्या मुलाला घडवण्यासाठी आई कशी खपते, त्याला चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी ती किती प्रयत्नशील असते, याचे अप्रत्यक्षपणे दर्शन या नाटकातून घडते. शालूच्या अबोध मनातील अमूर्त धालमेल नाटककाराने कलात्मकरीत्या शब्दबद्घ केली आहे. दररोजच्या जीवनव्यवहाराच्या चैतन्यमानि नाटकातील संवाट जिवंत कसे होतात? मानवी मनातील अगम्य गुते नाटककार किती सहजतेने उलगडून दाखवतात? छोट्या-मोठ्या नाट्यमय प्रसंगांतून नाटक उत्कर्षबिंदूपर्वंत कसे पोहोचते? हे सगळे समजून घ्यायचे असेल तर मुळातून पूर्ण नाटक वाचा. जमले तर प्रयोगही पाहा. प्रस्तुत उताऱ्यातील काल्पनिक मुलाबद्दलचा शालूचा वात्सल्यम्रोत आपल्या मनात संवेदनशीलता निर्माण करणारा आहे. या नाटकातील काही भाग खाली दिलेला आहे.

स्वाध्याय 


(अ)शालू वहिनीची स्वभाववैशिष्ट्ये
उत्तरे:
(१)कल्पनेच्या जगात रमणारी
(२) मुलाबाबत अति संवेदनशील
(३)मनस्वी
(४)अत्यंत माया करणारी

(आ) सदाची स्वभाववैशिष्ट्ये
उत्तरे:
(१)घुमा
(२)अबोल
(३)तटस्थ
(४)समजूतदार


(इ)शालूवहिनीनी वर्णन केलेली डॉ. समीरची वैशिष्ट्ये
(१) असलेल्या माणसावर उपचार करण्याचा अधिकार असलेला
(२) असलेले माणूस नसलेले ठरवण्याचा अधिकार नसलेला

 (२) स्पष्ट करा.

(अ) शालूवहिनींचे पुत्रप्रेम - शालूवहिनीला मोहित अस्तित्वात असल्याचा जबरदस्त विश्वास आहे. त्या मोहितला दृष्टिआड करू इच्छित नाहीत. त्यांच्या कल्पनेत व प्रत्यक्षात तो सतत डोळ्यांसमोर उभा राहतो. त्याची प्रत्येक वस्तू शालूवहिनी मायेने जपतात. मोहितवर प्रचंड प्रेम करतात व त्यामुळे त्याची सतत काळजी वाहतात.

(आ) सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे
मोहित – शालूवहिनींचे विश्व मोहित एवढेच सीमित आहे. नसलेल्या मोहित काळजी करणे व त्याच्यावर जिवापाड प्रेम हेच शालूवहिनींच्या जीवनाचे ध्येय आहे. सदानंदला वस्तुस्थिती माहीत असूनही त्याने जीवघेणी तडजोड केली आहे. शालूवहिनींसाठी सदाने सारे जग तोडले आहे. 'नाही' ती गोष्ट 'आहे' म्हणून जगण्यात तोही धन्यता मानतो. अशा प्रकारे सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व मोहित आहे.

(३) उताऱ्यातील संवादांमधील विधानांचा अर्थ स्पष्ट करा :

(अ) नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उत्तर: नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो - शालूवहिनी नसलेल्या मोहितच्या भासात जेव्हा अडकली, तेव्हा सदा तिच्या या मानसिक स्थितीला कंटाळून दोन दिवस घराच्या बाहेर राहिला. जेव्हा तो घरी परतला तेव्हा शालू उपाशी राहिलेली त्याला कळले आणि ती रडत सांगत होती की, ती उपाशी राहिल्यामुळे मोहित दूध मिळाले नाही. ती त्वेषाने सदाला म्हणाली की 'तुम्हांला बापाचं काळीज आहे की नाही'. या तिच्या वाक्याने सदा हादरला. म्हणून या 'बापपणाच्या नव्या जबाबदारीच्या ओझ्याने वाकलो', असे सदा म्हणाला.

(आ) इच्छेला शरीर असायलाच हवं का?
उत्तर: इच्छेला शरीर असायला हवं का? -सदा घरात नसताना जेव्हा शालू जेवली नाही व मोहितही उपाशी राहिला असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा सदाला गलबलून आले. मोहितला वाढवायचे अशी त्याने मनाशी खूणगाठ बांधली. कुणाचेही आयुष्य स्वयंभू नसते, याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. शेवटी आपण एकमेकांच्या इच्छेसाठीच जगायचे असते, असे सदाने स्वत:ला समजावले. म्हणून पुढे तो म्हणतो की इच्छेला शरीर असायलाच हवे, असे नाही.

(४) स्वमत

(अ) तुमच्या मते, शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर : प्रत्येक स्त्रीच्या मनात मातृत्व ही भावना असते. मूल नाही झाले, तरी मातृत्व ही भावना कमी होत नाही. निपत्रिक असलेले माता पिता हे कुत्रा किंवा तत्सम प्राण्यावर प्रेम करून ही भावना शमवताना आपण पाहतो. नाट्यउताऱ्यात शालूच्या मातृत्वाच्या भावना नैसर्गिक आहेत. मूल नसताना मूल आहे, असे स्वप्न ती साक्षात पाहते. यातून 'मोहित' या काल्पनिक मुलाचा जन्म आहे. कुठलीही माता जशी मुलावर निरतिशय प्रेम करेल तसेच प्रेम शालू या काल्पनिक मुलावर करते व आपली अतृप्त मातृत्वाची भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी शालूची नजर त्यांच्या बाळाला लागेल म्हणून तिला बारशाला बोलवायला नाकारले. या खुळ्या सामाजिक समजुतीमुळे शालू पिसाळल्यागत झाली आणि मोहितचे स्वप्न खरे मानू लागली. असल्या मागासलेल्या सामाजिक चालीरीतींचा हा दोष आहे. म्हणून शालचे वागणे तिच्या मानसिक पातळीवर योग्य आहे, असे वाटते.

 (२) 'शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे,' या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर : शालू वहिनी सी होम सायन्स मध्ये चाईल्ड सायकॉलॉजी शिकलेली सुशिक्षित व सुजाण स्त्री आहे. कुठल्याही स्त्रीच्या मनात मातृत्व ही महत्त्वाची भावना नैसर्गिकपणे स्थित असते. तशी ती शालूवहिनीच्याही मनात आहे. पुत्र होत नसल्यामुळे ती अस्वस्थ होती. तशात खुळचट सामाजिक रूढीमुळे तिला इतरांच्या मुलांच्या बारशांपासून बुडून गेली. वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे 'मोहित' या काल्पनिक पुत्रप्रेमात ती बुडून गेली.
मोहितला न्हाऊ-माखू घालणे, भरवणे इथपासून तो जसजसा तिच्या मानसिक कल्पनेत मोठा होऊ लागतो, तसतशी ती त्याची मायेने काळजी वाहते. त्याची खेळण्याची रॅकेट, शर्ट, पॅन्ट, बनियन, टॉवेल, बूट इत्यादी छोट्या छोट्या गोष्टीत ती इतर मातांप्रमाणेच लक्ष पुरवते. त्याचा जेवणाचा डबा कणकेच्या शिऱ्यावर साजूक तुपाचा तवंग देऊन सजवते. तो खेळून दमूनभागून आला की त्याचा चेहरा प्रेमळ नजरेने न्याहाळून त्याचे ते रुपडे डोळ्यांत साठवते. घरात तो नसताना त्याच्या ट्रेकिंगचे कारण सदानंदला देते.
अशा प्रकारे शालूवहिनीचे पुत्रप्रेम हे इतर माउलींप्रमाणेच नैसर्गिक ठरते.

 (३) शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
उत्तर : 'ध्यानीमनी' या नाट्यउताऱ्यामध्ये नाटककार प्रशांत दळवी यांनी 'मोहित' या काल्पनिक मुलावर प्रेम करणाऱ्या शालूवहिनीची मानसिक आर्तता व्यक्त करणारे मोठे स्वगत लिहिले आहे. त्यात मोहितच्या कपड्यांबाबत तपशीलवार विवेचन आले आहे.
डॉ. समीरला 'मोहित' खरेच घरात वावरतो आहे, हे पटवून देताना शालू वहिनी त्याला मोहितच्या कपड्यांचे दाखले देते. तो मोठा झालाय हे सांगताना शालू वहिनी म्हणते-हे मोहितचे कपडे वाढत्या उंची बरोबर आखूड होतायत; हा त्याचा शर्ट, ही पॅन्ट, हा टॉवेल, बनियन, हे बूट त्याच्या आजोबांनी दिलेत. हे त्याचे मोजे, बघा अजून ओले आहेत. 'मोहित' खरेच आहे हे पटवून देताना शालूवहिनी पुढे म्हणते-कपड्यांना मोहितच्या शरीराचा गंध आहे. त्याच्या घामाचा गंध आहे.
मोहितच्या या कपड्यांच्या तपशीलवार वर्णनातून शालू वहिनीच्या मनात मोहितचे अस्तित्व किती जिवंत आहे, हे नाटककाराने पटवून दिले आहे.

(५) अभिव्यक्ती

 (१) शालूला सदाने का साथ दिली असावी, ते स्पष्ट करा.
उत्तर : 'ध्यानीमनी' या नाट्य उताऱ्यात शालू वहिनी व सदा या अपत्यहीन जोडप्यांची दोन मोठी स्वगते नाटककार प्रशांत दळवी यांनी सादर केली आहेत. त्यांतून दोघांच्याही मनाची घुसमट आपल्याला प्रकर्षाने जाणवते.
'मोहित' प्रत्यक्ष असल्याचा भास जेव्हा शालूवहिनीला होतो, तेव्हा सदा हादरतो. तिच्या हवेतल्या गप्पा ऐकून दोन दिवस तो घरी येत नाही. पण जेव्हा त्याला कळते की दोन दिवस शालू जेवली नाही व नसलेल्या मोहितलाही दूध मिळाले नाही; तेव्हा तो गलबलून जातो. नसलेल्या बाळाच्या बापाची जबाबदारी शालू त्याच्यावर सोपवते. तेव्हापासून तिच्या पदराआड एक जावळ असलेले बाळ लपलेय, असे त्यालाही वाटू लागले. शालूचा चेहरा खुललेला पाहून तिच्या या भासमय जगाला साथ
देण्याचे त्याने ठरवले, शालूला दोषी ठरवणे सदाला मान्य नव्हते. म्हणून रडत, कण्हत कोरडे आयुष्य जगण्यापेक्षा तिला साथ देण्याचा सोपा मार्ग सदाने निवडला, शालूच्या तीव्र इच्छेला प्रमाण मानून दुसऱ्याला जगण्याचे जीवनसत्त्व कल्पनेतून का होईना, पण दयायचा सदाने निश्चय केला व शालला त्याने साथ दिली.

(२) 'प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते,' या विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तर : 'ध्यानीमनी' या नाट्यउताच्यात शालूवहिनीच्या व्यक्तिरेखेतून नाटककार प्रशांत दळवी यांनी आईपणाची मूर्ती साकार केली आहे. अपत्यप्राप्ती हा स्त्रीच्या आयुष्यातला परमोच्च आनंद असतो. 'मातृत्व' हे स्त्रीच्या जीवनातले साफल्य आहे. निसर्गतः आईपणाची ओढ स्त्रीला असते. शालूवहिनीही या गोष्टीला अपवाद नाही. तिला अपत्य होत नाही; म्हणून मानसिक पातळीवर 'मोहित' नावाचे काल्पनिक बाळाचे अस्तित्व ती मानते व त्याच्यावर इतकी माया करते की ती सत्य जगातच वावरते आहे, असे वाटू लागते. डॉ. समीरला शालू वहिनी मानसिक रुग्ण वाटते; परंतु शालू वहिनी त्याला मोहितच्या दैनंदिन जगण्याच्या बारीकसारीक गोष्टी तपशीलवार सांगते. तिच्या आंतरिक इच्छेला तिने 'मोहित' नावाचे शरीर दिलेले आहे. यातून नाटककाराने आईला असलेली पुत्रप्रेमाची ओढ अधोरेखित केली आहे.
प्रत्येक स्त्रीच्या मनात ममत्व आणि वात्सल्य यांचा नैसर्गिक झरा वाहत असतो. पुत्रप्राप्तीनंतर हेच वात्सल्य साकार होते व तिच्या आयुष्याची परिपूर्ती होते. अशा प्रकारे शालूवहिनीचे पुत्रप्रेम आहे, तेच प्रत्येक मातेच्या हृदयात वसत असते आणि प्रत्येकाचीच आई शालसारखीच पत्रप्रेमाची भकेलेली असते. या विधानातील सत्यता पटते.

(३) नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर : नाटककार प्रशांत दळवी यांनी 'ध्यानीमनी' या नाट्य उताऱ्यात शालू वहिनी व सदानंद यांची दोन मोठी स्वगते लिहिली आहेत. मूल आहेच असे मानणाऱ्या शालूवहिनीच्या स्वगतातून तिच्या मनाच्या खोल डोहातील भावतरंग कळतात. पण नाट्यउताऱ्याचा शेवट । सदाच्या स्वगतातून केल्यामुळे संपूर्ण नाट्यउताऱ्याचा तोल सांभाळला जातो.
सदाच्या म्हणण्यातून त्याच्या मनाची घुसमट आणि समंजसपणा, तटस्थपणा यांची प्रचिती येते. डॉ. समीरला सदा शेवटी असे सांगतो की आपले अस्तित्व स्वयंभू नसते. एकमेकांच्या इच्छेखातर आपण जगतो. तू आमचे प्रश्न समजून घेऊ शकणार नाहीस ; कारण नैसर्गिक विषमतेवर कोणताही वैदयकीय उपचार नाही. आहे ती वस्तुस्थिती मी स्वीकारली आहे व जगण्याचे जीवनसत्त्व दुसऱ्यांना दयायचे मी ठरवले आहे. शालूच्या लेखी आता मोहित अस्तित्वात आहे, हे मान्य करावे लागले नाहीतर आमच्या जगण्यातली ऊर्जा निघून जाऊन आम्ही फक्त पांढरेफटक पडू, बर्फाचे निर्जीव पांढरे गोळे ठरू. तुम्ही आमच्या जगातून निघून जा.
नाट्यउताऱ्याच्या या शेवटामुळे मानसिक इच्छा प्राबल्य मनावर ठसवण्यात नाटककार यशस्वी झाले आहेत. मनातील भावतरंगांवर कोणताही बाह्य उपचार नसतो, ते तसेच स्वयंभूपणे वाहत राहण्यातच स्वाभाविकता आहे, हे तत्त्व शेवटी दृढ केले आहे. त्यामुळे वाचकांची व रसिकांची दिङमढ अवस्था होते.